Spread the love

नांद येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा!

जनजागृती रॅलीतून संविधानाचा संदेश; विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांद, नागपूर (प्रतिनिधी) :

नांद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) येथे २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावात जनजागृती रॅली काढण्यात आली, तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.

संविधान दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि विविध जनजागृतीपर फलक घेऊन गावातून शिस्तबद्ध रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी भाषणातून मांडले संविधानाचे महत्त्व

रॅलीनंतर शाळेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या प्रारंभी मुख्याध्यापिका कुंदा घोडमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी रुजल चाचेरकर, तसेच इयत्ता दुसरीतील संक्षिप्त, गणेश आणि शौर्या बावणे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान वयातच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्त्व, त्यातील मूल्ये आणि नागरिकांची जबाबदारी याविषयी विचार मांडले.

शिक्षक व विद्यार्थ्यांचे परिश्रम

मुख्याध्यापिका कुंदा घोडमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, लोकशाही मूल्यांची ओळख करून देणे आणि नागरिकत्वाची जाणीव रुजविणे, या दृष्टीने शाळेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version