संविधान दिनानिमित्त भडगाव दिवाणी न्यायालयात विधी साक्षरता शिबिर!
राष्ट्रीय लोक अदालतीतून तंटामुक्त व जलद न्यायदानाचा संदेश; १२ डिसेंबरच्या लोक अदालतीत प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याचे आवाहन
भडगाव (प्रतिनिधी – गणेश रावळ) :
भारतीय संविधान दिनानिमित्त भडगाव येथील दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) येथे विशेष विधी साक्षरता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. संविधानातील मूलभूत मूल्यांचा जागर, नागरिकांना कायदेशीर अधिकारांची माहिती आणि न्यायप्रक्रियेबाबत जनजागृती या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिबिराच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) प्रा. वि. राजळे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संवैधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ॲड. घनश्याम मोरे यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि कायदेशीर तरतुदींवर मार्गदर्शन
शिबिरात ॲड. आर. के. वाणी यांनी उपस्थित नागरिक आणि पक्षकारांना विविध कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह आणि कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व भरणपोषणाचे अधिकार, पर्यायी विवाद निवारण पद्धती (ADR) तसेच भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
कायदेशीर अधिकारांची माहिती असणे आणि उपलब्ध न्यायव्यवस्थेचा योग्य वेळी उपयोग करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन
अध्यक्षीय संबोधनात दिवाणी न्यायाधीश प्रा. वि. राजळे यांनी भारतीय संविधानाची सर्वोच्चता आणि लोकशाही व्यवस्थेतील त्याचे महत्त्व विशद केले. न्यायप्रक्रियेत सामंजस्याला असलेले महत्त्व सांगताना त्यांनी लोक अदालतीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला.
प्रलंबित दाव्यांचा जलद, कमी खर्चात आणि परस्पर सामंजस्यातून निपटारा करण्यासाठी लोक अदालत हे प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त नागरिक आणि पक्षकारांनी सहभागी व्हावे. आपापसांतील वाद सामंजस्याने मिटवून या वैधानिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वकील संघाचे सहकार्य; मान्यवरांची उपस्थिती
या विधी साक्षरता शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भडगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील यांच्यासह संघातील सर्व ज्येष्ठ विधिज्ञांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अभिजीत सुकलाल दायमा यांनी केले, तर ॲड. उमेश महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या शिबिरास तालुका विधी सेवा समितीचे सदस्य, भडगाव तालुका वकील संघाचे पदाधिकारी, विधिज्ञ, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
