Spread the love

कि. सो. क. न्यू सिटी हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा!

ज्येष्ठ शिक्षिका व्ही. पी. सुळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचे मुख्याध्यापक एन. व्ही. नागरे यांचे आवाहन

धुळे (प्रतिनिधी) :

धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनुजी करनकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे आणि त्यांच्यामध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही. नागरे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका व्ही. पी. सुळे उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्याध्यापक एस. व्ही. भामरे, पर्यवेक्षक डॉ. एन. यू. बागुल आणि सांस्कृतिक विभागप्रमुख एन. डी. हलोर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संविधानाच्या इतिहासासह नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद

प्रमुख वक्त्या व्ही. पी. सुळे यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला, तर २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आले, याची माहिती त्यांनी दिली. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.

संविधानाने देशाला दिलेली मूल्ये आणि नैतिक तत्त्वे प्रत्येक नागरिकाने जपली पाहिजेत. विद्यार्थ्यांनीही संविधानातील विचार आत्मसात करून जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संविधानाप्रती आदर आणि कृतज्ञता जपण्याचे आवाहन

अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक एन. व्ही. नागरे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाप्रती आदर, कृतज्ञता आणि समर्पणभाव व्यक्त करण्याचे आवाहन केले. संविधान दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित कार्यक्रम नसून भारतीय संस्कार, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक विचारांची जपणूक करण्याची प्रेरणा देणारा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचा उद्देश उपमुख्याध्यापक एस. व्ही. भामरे यांनी प्रास्ताविकातून विशद केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कलाशिक्षिका एस. एस. जोशी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक ए. के. वानखेडे यांनी केले, तर नितीन ठाकूर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षक एस. एस. भंडारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version