Spread the love

दुर्गा टेकडीवरील १०० झाडांवर कुऱ्हाड? प्रस्तावित वृक्षतोडीला स्थगिती द्या!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सचिन काळभोर यांची मागणी; महापालिकेच्या उद्यान विभागाच्या नोटिसांवर आक्षेप

पिंपरी-चिंचवड :

निगडी येथील प्रसिद्ध दुर्गा टेकडीवरील सुमारे १०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित झाडांवर जाहीर नोटीस लावल्याने वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रस्तावित वृक्षतोडीला तातडीने स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रशासन एका बाजूला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करते; तर दुसरीकडे शहरातील महत्त्वाच्या हरितक्षेत्रातील झाडे तोडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

७१ एकर क्षेत्रात हजारो झाडांचा हरित ठेवा

दुर्गा टेकडी परिसरात सुमारे ७१ एकर क्षेत्रावर हजारो झाडांची लागवड करण्यात आली असून, हा परिसर शहरातील महत्त्वाच्या हरितक्षेत्रांपैकी एक मानला जातो. दररोज पहाटे पाच वाजल्यापासून सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत हजारो नागरिक येथे व्यायाम, मॉर्निंग वॉक आणि आरोग्यविषयक उपक्रमांसाठी येतात. वाढत्या काँक्रिटीकरणाच्या पार्श्वभूमीवर दुर्गा टेकडी शहरासाठी निसर्गाचा महत्त्वाचा आधार ठरत असल्याचे काळभोर यांनी नमूद केले.

१८ कोटींच्या तरतुदीचा मुद्दा उपस्थित

दुर्गा टेकडीवरील झाडांचे संवर्धन आणि देखभालीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाला सुमारे १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. झाडांची निगा राखण्यासाठी आणि हरितक्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी निधी उपलब्ध असताना वृक्षतोडीच्या नोटिसा का लावण्यात आल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रस्तावित वृक्षतोडीला लेखी आदेशाद्वारे स्थगिती द्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे. संबंधित झाडांचे प्रत्यक्ष पर्यावरणीय मूल्यांकन करून वृक्षतोडीची आवश्यकता तपासावी, तसेच पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या निर्णयांची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दुर्गा टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य आणि हरितसंपदा जपणे ही संपूर्ण शहराची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे वृक्षतोडीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पर्यावरणतज्ज्ञ, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींची मते जाणून घ्यावीत. प्रस्तावित वृक्षतोड थांबवून दुर्गा टेकडीवरील हरितक्षेत्राचे संरक्षण करावे, असे आवाहन सचिन काळभोर यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version