Spread the love

उद्योगांच्या CSR निधीतून नशिराबादचा विकास साधणार; शेतकऱ्यांच्या चाऱ्यासाठीही विशेष तरतुदीची मागणी!

नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक; प्रदूषण, दुर्गंधी आणि सांडपाण्याच्या प्रश्नांवर कंपन्यांना स्पष्ट सूचना

नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा प्रभावी वापर करावा, तसेच सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी, अशी आग्रही मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील यांनी केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली नशिराबाद नगरपरिषदेत औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत CSR निधीच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुधारणा आणि सार्वजनिक ठिकाणांच्या विकासासाठी आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून शहराचा विकास साधण्यासोबतच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा, हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता.

प्रदूषण नियंत्रणासाठी कंपन्यांना सूचना

औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. भाग्यवर्धन कंपनीतून बाहेर पडणाऱ्या अशुद्ध पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी कंपनी प्रतिनिधींना दिल्या.

यावेळी ते म्हणाले, “व्यापार आणि उद्योगांचे नेहमीच स्वागत आहे; मात्र उद्योग-व्यवसाय करताना नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणे ही प्रत्येक व्यावसायिकाची सर्वप्रथम जबाबदारी आहे.”

सिमेंटच्या धुळीचा त्रास कमी करण्याची मागणी

अदाणी सिमेंट कंपनीतून हवेत पसरणाऱ्या सिमेंटच्या धूलिकणांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. धूलिकणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सक्शन मशीन बसविण्यासह आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना नगरसेवक लालचंद भाऊ पाटील यांनी केली. नागरिक आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कंपनीने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

दुर्गंधीच्या तक्रारींची गंभीर दखल

समृद्धी केमिकल कंपनीतून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त वासाबाबतही उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावर नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज भाऊ महाजन यांनी कंपनीच्या मालकांना स्पष्ट सूचना दिल्या. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये आणि परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी बजावले.

बैठकीला नगरपरिषद पदाधिकारी आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित

या बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील, उपनगराध्यक्ष पंकज भाऊ महाजन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. सोनवणे, भाजप गटनेते लालचंद भाऊ पाटील, सभापती चेतन भाऊ बऱ्हाटे, अस्लम सर, वासिफ अली सर, बापू दादा बोढरे, सचिन भाऊ महाजन, विकास भाऊ धनगर, ॲड. इक्बाल भाऊ तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

औद्योगिक कंपन्यांच्या वतीने श्रीराम पाईप व सिका ई-बाईकचे श्रीराम दादा पाटील, हिरा रोटोचे धनंजय खडके, समृद्धी केमिकल प्रा. लि.चे प्रतिनिधी, सद्गुरू पाईपचे प्रियदर्शन अमृत गुर्जर, अदाणी सिमेंटचे श्री. मोरे, भाग्यवर्धन पॉलीफ्लेक्सचे ललित धनगर, खोशल प्लास्टोचे श्री. नारखेडे आणि विजय ॲग्रोचे नरेंद्र सोमाणी उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी औद्योगिक क्षेत्राचे सहकार्य मिळविणे, शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणे आणि औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण आणणे, या महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या चर्चेमुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version