Spread the love

साकत केंद्रशाळेत संविधान दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या चित्रकला, भाषण आणि नृत्य सादरीकरणातून संविधानिक मूल्यांचा जागर

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी – बापुसाहेब घोडेस्वार

साकत : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, साकत येथे गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या मूल्यांची रुजवण व्हावी, या उद्देशाने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक वैजनाथ गीते यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय, तसेच दैनंदिन जीवनात संविधानाचे महत्त्व काय आहे, याची सोप्या शब्दांत माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय, समता आणि मानवतेसाठी समर्पित केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला समान हक्क आणि स्वातंत्र्याची हमी देणारे संविधान देशाला मिळाले, असे त्यांनी नमूद केले.

संविधान दिनानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चित्रकला, प्रभावी भाषणे आणि नृत्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपली कला व कल्पकता दाखवून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिक्षक निलेश कांबळे यांनी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया आणि अंमलबजावणी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला, तर २६ जानेवारी १९५० रोजी त्याची देशात अंमलबजावणी झाली, ही ऐतिहासिक माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका प्रतिभा पवार, सुप्रिया निगुडे, शेख मॅडम तसेच शिक्षक प्रदीप कांबळे यांनी नियोजन व परिश्रम घेतले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version