मोहाडी येथे सलग दुसऱ्या वर्षी संविधान दिन उत्साहात!
गीतांच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचा जागर; पोस्टर प्रदर्शनातून युवकांना लोकशाहीची ओळख
मोहाडी, दि. २६ नोव्हेंबर : आंबेडकर चौकातील बुद्ध विहार येथे सलग दुसऱ्या वर्षी संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. धुंजन फेलो मयुरी जाधव यांच्या आयोजनातून झालेल्या या कार्यक्रमाचा उद्देश समाजात संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि युवकांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव रुजविणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते मनोज नगराळे यांनी भारतीय संविधानाचा इतिहास, संविधान निर्मितीपूर्वीची सामाजिक परिस्थिती आणि संविधानाचे महत्त्व विशद केले. स्वातंत्र्य, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या संविधानिक मूल्यांची माहिती त्यांनी गीतांच्या माध्यमातून सोप्या व प्रभावी पद्धतीने उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या संविधानिक मूल्यांवरील पोस्टर प्रदर्शनातून समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या संकल्पनांची चित्रांच्या माध्यमातून मांडणी करण्यात आली. या प्रदर्शनामुळे युवकांना संविधानातील मूलभूत मूल्ये समजून घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाला १८ ते २४ वर्षे वयोगटातील युवकांसह मोहाडी वस्तीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काव्य कोकणे आणि गौतमी वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले, तर नागेश वानखेडे यांनी आभार मानले.
