Spread the love

खडके गावात संविधान दिन आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती प्रभात फेरी!

६५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; संविधानिक मूल्यांचे जतन आणि बालविवाहमुक्त समाजाचा संदेश

खडके (प्रतिनिधी) : संविधान दिन (२६ नोव्हेंबर) आणि जागतिक बालविवाह प्रतिबंध दिन (२७ नोव्हेंबर) यांचे औचित्य साधून खडके गावात विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. भारतीय संविधानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे तसेच बालविवाहाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करून बालविवाह रोखण्याचा संदेश देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या प्रभात फेरीत शाळेतील सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी हातात विविध जनजागृतीपर फलक आणि बॅनर्स घेऊन गावातून शिस्तबद्ध रॅली काढली. ‘संविधान हमारा, सबसे प्यारा’, ‘भारत माता की जय’ तसेच बालविवाहमुक्तीचा संदेश देणाऱ्या घोषणांनी गावातील वातावरण जागृत झाले. विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत संविधानिक मूल्यांचे जतन आणि बालकांचे हक्क सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले.

बालविवाहामुळे मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यावर होणारे परिणाम लक्षात घेता बालविवाहाला आळा घालणे आवश्यक आहे. प्रत्येक बालकाला शिक्षणाचा आणि सुरक्षित बालपणाचा अधिकार मिळावा, तसेच संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा समाजात प्रसार व्हावा, हा संदेश या प्रभात फेरीतून देण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक उत्तम बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी दिपाली सुनील हिवाळे आणि सुनील जगन हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांच्या सहभागामुळे प्रभात फेरी यशस्वी व प्रेरणादायी ठरली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version