Spread the love

कुऱ्हा हरदो शाळेत संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा!

प्रभात फेरी, भाषणे, संविधान गीत, नृत्य आणि चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘आपले संविधान, आपला अभिमान’चा जागर

कुऱ्हा हरदो (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि संविधानिक मूल्यांची रुजवण व्हावी, या उद्देशाने शाळेत ‘भारतीय संविधान आपला अभिमान’ या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच संविधानाच्या उद्देशिकेस मुख्याध्यापक गजानन कोठाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर डॉ. वैशाली राहुल संसारे यांनी मार्गदर्शनपर सत्र घेतले. संविधान म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये आणि जीवनातील नियमांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले.

प्रभात फेरीतून संविधानाचा संदेश

संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर समाजात संविधानाचे महत्त्व रुजविण्यासाठी गावातून जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित घोषवाक्ये देत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांच्या भाषणांतून संविधानाचा गौरव

प्रभात फेरीनंतर विद्यार्थ्यांनी संविधान निर्मिती, त्याचे महत्त्व आणि संविधानिक मूल्यांवर भाषणे सादर केली. देवांश रोकडे, प्रतीक्षा माळी, आरुषी माळी, चैताली इंगळे, निधी कोळी, वेदिका माळी, भाग्यश्री सुरळकर, आशिष कांडेलकर आणि सार्थक माळी यांनी मराठीतून, तर प्रगती माळी व पूजा पाटील यांनी हिंदीतून आणि लक्ष्मी इटणारे यांनी इंग्रजीतून आपले विचार मांडले.

इयत्ता सहावी आणि सातवीतील विद्यार्थिनींनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे संविधान गीत सादर केले. तसेच ‘भारत देशाची शान, भीमा तुझे संविधान’ या गीतावर सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

चित्रकला, प्रश्नमंजुषा आणि सेल्फी पॉइंटचे आकर्षण

विद्यार्थ्यांमध्ये दृश्यकलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संविधानातील एकता आणि अखंडता या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी ‘आपले संविधान, आपला अभिमान’ हा विशेष सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला. याशिवाय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषाही घेण्यात आली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना संविधानाशी अधिक जवळीक साधण्याची संधी मिळाली.

यावेळी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भागवत टीकारे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

शिक्षकांचे मोलाचे सहकार्य

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक गजानन कोठाळे, योगेश बोरोले, छाया बहुरूपे, नितीन लांडे आणि डॉ. वैशाली संसारे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version