नाला खोलीकरण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव व धरणगाव तालुक्यांत ४७२ किलोमीटर नाला खोलीकरणाचे उद्दिष्ट; यापूर्वीच्या ६२ किलोमीटर कामाचा दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा
विवरे–भवरखेडे शिवारातील दोन मोठ्या नाल्यांच्या सहा किलोमीटर खोलीकरणाचे भूमिपूजन; शेतरस्ता व सभागृहाच्या बांधकामाला मंजुरी देण्याची ग्वाही
धरणगाव, दि. २७ (प्रतिनिधी – अजय बाविस्कर) : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या मदतीसोबतच पाण्याची उपलब्धता वाढविणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या ६२ किलोमीटर नाला खोलीकरणाचे सकारात्मक परिणाम आजच्या दुष्काळी परिस्थितीतही दिसून येत आहेत. अनेक भागांतील विहिरींना पाण्याचा आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी थांबवायचे असेल, तर त्यांच्या शिवारातील पाणी अडवले पाहिजे. त्यामुळे नाला खोलीकरणाची व्यापक मोहीम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील विवरे–भवरखेडे शिवारातील दोन मोठ्या नाल्यांच्या एकूण सहा किलोमीटर लांबीच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी विवरे येथील शेतरस्ता तसेच हनुमान मंदिरासमोरील सभागृहाच्या बांधकामाला मंजुरी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
जळगाव व धरणगाव तालुक्यांत ४७२ किलोमीटरचे उद्दिष्ट
पालकमंत्री पाटील म्हणाले की, उद्योगपती अशोकभाऊ जैन आणि तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंधारणाच्या व्यापक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी जळगाव व धरणगाव तालुक्यांत एकूण ४७२ किलोमीटर नाला खोलीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यापूर्वीच्या ६२ किलोमीटर कामाचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता प्रशासन, सीएसआर निधी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आगामी पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
किलोमीटरपेक्षा विहिरींतील पाणी महत्त्वाचे!
नाला खोलीकरणामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास आणि जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे. परिणामी भूजल पातळीत वाढ होऊन शेतीच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढू शकते. नाला किती किलोमीटर खोदला, यापेक्षा किती शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी मिळाले आणि किती गावांची पाणीटंचाई कमी झाली, हेच या मोहिमेच्या यशाचे खरे मोजमाप असेल. जलसंधारणावर आज केलेला खर्च म्हणजे शेतकऱ्यांच्या उद्याच्या समृद्धीसाठी केलेली गुंतवणूक आहे, असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना लोकसहभागातून कामात सहभागी होण्याचे आवाहन केले.
विशेष चौकट : नाला खोदणाऱ्या हातांनाच भूमिपूजनाचा मान!
भूमिपूजन सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रमप्रतिष्ठेचा संदेश देणारी अनोखी कृती केली. भूमिपूजनाचा मान स्वतः न घेता प्रत्यक्ष नाला खोलीकरणाचे काम करणारे जेसीबी चालक अजित सहानी आणि जयहिंद पाल यांच्या हस्ते भूमिपूजन करवून घेतले. यावेळी दोघांचा सत्कारही करण्यात आला.
ज्यांच्या घामातून शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी साठविण्याचे काम होणार आहे, त्यांच्याच हातून कामाचा शुभारंभ करण्यात आला. कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा आणि कामगारांना सन्मान देणारी ही कृती सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे, बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती प्रमोद पाटील, दीपक भदाणे, मुगलाल पाटील, गिरीश पाटील, भूषण महाजन, सोपान पाटील, संजय भामरे, शशी महाराज यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा नेते प्रतापराव पाटील यांनी नाला खोलीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची व्याप्ती, शेतकऱ्यांना होणारे संभाव्य फायदे आणि आगामी कामांच्या नियोजनाची माहिती दिली. सूत्रसंचालन भैया मराठे यांनी केले, तर जलसंधारण विभागाचे उपअभियंता अमोल पाटील यांनी आभार मानले.
