Spread the love

पाळधी/धरणगाव /जळगाव : “धरणगाव शहरात आतापर्यंत २२ पेक्षा अधिक विविध सामाजिक सभागृहांची कामे मंजूर करून जवळपास अनेक पूर्णत्वास आणली आहेत. यासाठी सुमारे ९ कोटींचानिधी उपलब्ध करून दिला आहे. बडगुजर समाजाच्या मागणीनुसार उभारलेले हे सुंदर सभागृह समाजाच्या एकतेसाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी आणि विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी उपयोगी पडावे अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

धरणगाव शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उभारणीला नवी दिशा देणारा एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण आज अनुभवायला मिळाला. जिल्हा वार्षिक योजना (डीपीडीसी) अंतर्गत मंजूर २३ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बडगुजर समाजाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी बडगुजर समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार बडगुजर यांनी केले, तर प्रास्ताविकात बडगुजर पंचमंडळाचे धरणगाव अध्यक्ष मनोहर बडगुजर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले हे सभागृह आणि चामुंडा माता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केलेली वैयक्तिक मदत आमच्या विधान समाजाच्या कायम स्मरणात राहील. आभार सुमित बडगुजर यांनी मानले.

कार्यक्रमात नगराध्यक्ष लीलाताई चौधरी तसेच चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी हे सामाजिक सभागृह म्हणजे समाजातील एकोप्याचा आणि विकासाच्या वाटचालीचा प्रेरणादायी उत्सव असल्याचे आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक केले.

यांची होती विशेष उपस्थिती
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष चौधरी, उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन, नगरपरिषद गटनेते विलास महाजन, माजी नगरसेवक पप्पू भावे , शिवसेना शहरप्रमुख धीरज पूर्भे, नगरसेवक बुटा पाटील, अंजली विसावे, संजय महाजन, पवन महाजन, कैलास माळी, पुनीलाल महाजन, वाल्मिक पाटील, भानुदास विसावे, ललित येवले, बाळासाहेब जाधव यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बडगुजर पंचमंडळाचे सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version