Spread the love

२०२ धावांचा पाठलाग अवघ्या १८ षटकांत पूर्ण; आयपीएलमध्ये राजस्थानची सलग चौथी सरशी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन प्रीमियर लीग 2026 मधील १६व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स वर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. बरस्पारा क्रिकेट स्टेडिअम गुवाहाटी येथे झालेल्या या हाय-स्कोअरिंग सामन्यात राजस्थानने २०२ धावांचे आव्हान १८ षटकांत पूर्ण करत आपल्या विजयी मालिकेला पुढे नेले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत २०१/८ धावा केल्या. मात्र राजस्थानच्या आक्रमक फलंदाजीसमोर ही धावसंख्या अपुरी ठरली. वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांच्या जबरदस्त भागीदारीने सामन्याचे पारडे पूर्णपणे फिरवले.

आरसीबीची सुरुवात धक्कादायक ठरली. फील स्टॉल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र विराट कोहली याने १६ चेंडूत ३२ धावा करत संघाला वेग दिला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार याने ४० चेंडूत ६३ धावा करत डाव सावरला. शेवटच्या टप्प्यात वेंकटेश लायर (२९ धावा) आणि भुवनेश्वर कुमार यांनी संघाला २०० पार नेले.

राजस्थानकडून जोफरा आर्चेर याने सुरुवातीला अचूक मारा करत दोन बळी घेतले, तर रवी बिष्णोई याने मधल्या षटकांत २ विकेट्स घेत आरसीबीला रोखले. शेवटच्या षटकांत धावा आटोक्यात ठेवल्याने आरसीबीला मोठी मजल मारता आली नाही.

२०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने दमदार सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने अवघ्या २६ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी करत सामना आपल्या बाजूला झुकवला. दुसऱ्या बाजूने ध्रुव जुरेल याने ४३ चेंडूत ८१ नाबाद धावा करत संयमी आणि प्रभावी खेळ केला. या दोघांची शतकी भागीदारी हीच राजस्थानच्या विजयाची गुरुकिल्ली ठरली.

१४व्या षटकात सूर्यवंशीने सलग फटकेबाजी करत सामना निर्णायक वळणावर आणला. त्यानंतर जुरेलने शांतपणे डाव सांभाळत विजय निश्चित केला. राजस्थानने १८ षटकांतच लक्ष्य गाठत आपली फलंदाजीची ताकद दाखवून दिली. आरसीबीकडून कृणाल पांड्या याने २ बळी घेतले, तर जोश हजीवूड याने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. मात्र मधल्या षटकांत राजस्थानच्या फलंदाजांनी पूर्ण वर्चस्व गाजवले.

या विजयासह राजस्थानने स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवत गुणतालिकेत आपली पकड मजबूत केली आहे. सूर्यवंशीची ७८ धावांची खेळी आणि जुरेलचे नाबाद अर्धशतक या सामन्याचे खास आकर्षण ठरले. २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग इतक्या वेगाने पूर्ण करणे हा या हंगामातील उल्लेखनीय विक्रम ठरला. दरम्यान, पुढील सामन्यांमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपीटल अशा रोमांचक लढती रंगणार असून, स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version