Spread the love

महिनाभर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण; अनावश्यक खर्च टाळून शिक्षणाला द्या प्राधान्य

मुंबई :  महामानव प्रतिष्ठान आणि ‘एक वही एक पेन’ अभियानाच्या वतीने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील आर्थिक दुर्बल तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी या अभियानाअंतर्गत महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आजच्या काळात महापुरुषांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिन, सार्वजनिक उत्सव किंवा वाढदिवस यानिमित्त मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च केला जातो. मात्र या खर्चातील काही भाग समाजोपयोगी कार्यासाठी वापरला, तर अनेक गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.

अभियानाच्या माध्यमातून ‘एक वही एक पेन’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पुस्तके, दप्तरे यांसारखे शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, शक्य असल्यास विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, विनामूल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (एमपीएससी-युपीएससी) वर्ग सुरू करणे, तसेच शाळा व वस्त्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासावर आधारित निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि रमाई यांसारख्या महापुरुष व महामातांच्या जयंतीनिमित्तही शैक्षणिक साहित्य देऊन अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभियानाच्या आयोजकांनी नागरिकांना सुस्थितीत असलेले जुने मोबाईल, संगणक, लॅपटॉप, कपडे यांचेही दान करण्याचे आवाहन केले आहे. हे साहित्य संबंधित पुतळा समित्या किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर यंदा जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता ती सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी ठरावी, असा उद्देश अभियानामागे आहे.

या उपक्रमाअंतर्गत मुंबईसह राज्यातील दुर्गम व आदिवासी भागांमध्ये महिनाभर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी किंवा साहित्य देण्यासाठी इच्छुकांनी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अभियानाचे प्रणेते Raju Jhanke यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version