ज्येष्ठ गायिकेच्या निधनाने देश शोकसागरात; मंत्री गुलाबराव पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
मुंबई : भारतीय संगीतविश्वाला आपल्या बहुरंगी आणि अद्वितीय आवाजाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकमग्न झाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक महान कलाकार नव्हे, तर भारतीय संगीताची एक सजीव परंपराच हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे. “सुरांच्या स्वरगंगेतील एक अजरामर आवाज आज शांत झाला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंत्री पाटील यांनी म्हटले की, आशाताईंचा आवाज काळाच्या पलीकडे जाणारा होता. शास्त्रीय संगीत, भावगीत, गझल तसेच चित्रपटसंगीत अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या गायकीची अमिट छाप उमटवली. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये भावनांची अनोखी खोली असून, ती पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात आशा भोसले यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या सुरांनी केवळ मनोरंजनच नाही, तर संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन केले. त्यांच्या कार्यातून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या दु:खद प्रसंगी मंत्री पाटील यांनी आशा भोसले यांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. भारतीय संगीतविश्वातील हे अपूरणीय नुकसान असून, आशा भोसले यांच्या सुरांची जादू मात्र कायम रसिकांच्या हृदयात जिवंत राहणार आहे.
