Spread the love

रात्री उशिरापर्यंत पोलिस न पोहोचल्याने नाराजी; सीसीटीव्ही तपासून दोषींवर कारवाईचे आश्वासन

जळगाव  : जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर समाजकंटकाने पाडल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर बौद्ध समाजातील नागरिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने रात्री एकत्र येत संताप व्यक्त केला आणि संबंधित समाजकंटकाला तातडीने अटक करण्याची मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. यामुळे भीमसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, वाढता तणाव लक्षात घेता अखेर रात्री उशिरा पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संबंधित आरोपीचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर जमाव शांत झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

घटनेमुळे शिरसोली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच समाजातील शांतता व सलोखा टिकवण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version