सचिन काळभोर यांची सोशल मीडियावरून नाराजी; निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्षाचा आरोप
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून निवड प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काळभोर यांनी आपल्या पोस्टमध्ये पक्षासाठी दीर्घकाळ निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. शहरातील विविध नागरी प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे आणि जनसंपर्कातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी न देता, आमदार, खासदार, मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याशी जवळीक असलेल्या व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक पदांवर संधी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी स्वीकृत नगरसेवक पदांसाठी नावे जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली असून, या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत वातावरण अधिकच तापले आहे. काळभोर यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कमळ चिन्हाचा उल्लेख करत, “नवीन कार्यकर्त्यांना पुढे करून जुन्या निष्ठावंतांना बाजूला केले जात आहे,” असा थेट आरोप करण्यात आला आहे.
तसेच, त्यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाविषयीही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टनंतर कार्यकर्त्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असून, पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदांच्या अंतिम यादीत कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
