NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाळधी/धरणगाव/जळगाव : एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून तिला डिजिटल स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळेल तसेच एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘RuPay On-The-Go’ प्रणालीवर आधारित NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले.
धरणगाव तालुक्यातील पाळधी बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुमारे 700 लाभार्थ्यांना सवलतीच्या प्रवासाचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळत असून जनजागृतीलाही चालना मिळत आहे. या उपक्रमांतर्गत “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना”, “महिला सन्मान योजना” तसेच दिव्यांग प्रवासी सवलत योजना यांचा समावेश असून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, “75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना 50 टक्के सवलत आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजना शासनाची सामाजिक बांधिलकी दर्शवतात. प्रत्येक पात्र व्यक्तींनी पुढाकार घेऊन आपले कार्ड काढून घ्यावे आणि या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
या स्मार्ट कार्डद्वारे ‘वॉलेट टॉप-अप’ सुविधा उपलब्ध असून किमान 100 रुपयांपासून रिचार्ज करता येणार आहे. बसमधील ई-तिकीट मशीन, संकेतस्थळ, मोबाईल अॅप व अधिकृत केंद्रांमार्फत ही सेवा मिळणार आहे. आधार संलग्नतेमुळे प्रवास अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील एसटी आगार व बसस्थानकांवर या कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीपीएस ग्रुपचे दिलीप माळी यांनी केले. प्रास्ताविक बसस्थानक नियंत्रक शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सोपान माळी यांनी मानले. यांची होती उपस्थिती या वेळी शिवाजी पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, दिलीप माळी, सोपान माळी, आबा माळी, ग्रामपंचायत सदस्य चंदू इंगळे, अनिल माळी, समाधान माळी यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग उपस्थित होते.
