Spread the love

उत्पन्न ७.१८ कोटींवरून ९.९५ कोटींवर; ९१ लाखांहून अधिक निव्वळ शिल्लक, कर्मचाऱ्यांना २७% महागाई भत्ता

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांत आर्थिक आघाडीवर उल्लेखनीय कामगिरी करत उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, समितीने खर्च वजा जाता लाखो रुपयांचा नफा कमावला असून समितीची आर्थिक स्थिती भक्कम झाल्याची माहिती सभापती सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

💰 आर्थिक स्थिती भक्कम:
समितीच्या आकडेवारीनुसार, सन २०२३-२४ मध्ये ७ कोटी १८ लाख रुपये असलेले उत्पन्न सन २०२५-२६ मध्ये वाढून ९ कोटी ९५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्व खर्च वजा जाता ९१ लाख ३४ हजार २३५ रुपयांची निव्वळ शिल्लक राहिली आहे.

🏢 गाळे नूतनीकरणाला गती:
मुख्य यार्डमधील भूखंड कराराचा २००८ पासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास सुरुवात झाली आहे. एकूण २३५ अडते व व्यापाऱ्यांना नवीन नोंदणी करारनामे देण्यात येत असून, त्यापैकी ४० करारांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

👨‍💼 कर्मचाऱ्यांसाठी दिलासा:
समितीच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या ७७ कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिल २०२६ पासून २७ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊन कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. समितीच्या या सर्वांगीण प्रगतीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी सभापती सुनील महाजन, सदस्य अशोक राठी, इंद्रराज सपकाळे, सचिव कैलास शिंदे, सुनील तापडिया, दीपक महाजन, मांगीलाल जैन, मोहन बडगुजर, राजेंद्र जोशी, विवेक जैन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version