Spread the love

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना हवाय राष्ट्रपतींचा हस्तक्षेप

नवी दिल्ली/चंदीगड : आम आदमी पार्टीतील अंतर्गत बंडाळी आणि भाजपचा वाढता हल्लाबोल यामुळे दिल्ली ते पंजाबपर्यंतचे राजकारण कमालीचे तापले आहे. राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपने अरविंद केजरीवालांवर वैयक्तिक टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, तर दुसरीकडे आपल्या खासदारांना माघारी बोलावण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी थेट राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची विनंती केली आहे.

राघव चड्ढा यांनी ‘आप’ची साथ सोडल्यानंतर भाजपने अरविंद केजरीवालांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने अधिकृतपणे केजरीवालांचा उल्लेख ‘दिल्लीचे रहेमान डकैत’ असा केला आहे. जनतेच्या पैशांची लूट करून स्वतःसाठी आलिशान महाल बांधल्याचा आरोप करत भाजपने हा प्रहार केला आहे.

‘शीशमहाल २’ चे प्रदर्शन

भाजपने सोशल मीडियावर काही फोटो प्रसिद्ध केले आहेत, ज्याला ‘शीशमहाल भाग २’ असे म्हटले जात आहे. लोधी इस्टेटमधील एका आलिशान बंगल्यातील सुखसोयींचे हे फोटो असून, केजरीवालांचे ‘आम आदमी’ असणे हे केवळ एक ढोंग असल्याचे भाजपने म्हटले आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान राष्ट्रपतींच्या भेटीला

पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या ७ राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पंजाब सरकार हादरले आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आता घटनात्मक लढाई सुरू केली आहे. मुख्यमंत्री मान यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वेळ मागितली असून, या ७ खासदारांना पदावरून ‘रिकॉल’ (परत बोलावणे) करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ते करणार आहेत. “जनतेने ज्यांना विश्वासाने निवडून दिले, त्यांनी पक्षांतर करणे हा लोकशाहीचा अपमान आहे,” अशी भूमिका मान यांनी घेतली आहे. त्यांच्यासोबत पंजाबमधील अनेक आमदारही राष्ट्रपती भवनात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राघव चड्ढांचा ‘आप’वर पलटवार

पक्षांतर केल्यानंतर राघव चड्ढा यांनी मौन सोडले आहे. ‘शीशमहाल’ प्रकरणावरून त्यांनी ‘आप’वर टीका करताना म्हटले की, पक्षाच्या प्रतिमेला झालेल्या नुकसानीमुळेच निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यांनी ‘शीशमहाल २’ च्या पुराव्यांकडे लक्ष वेधत पक्षातील अंतर्गत कारभारावर नाराजी व्यक्त केली.

‘आप’कडून ‘फेक न्यूज’चा दावा

भाजपच्या आरोपांना उत्तर देताना ‘आप’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने प्रसिद्ध केलेले ‘शीशमहाल २’ चे फोटो बनावट असून ते इंटरनेटवरून (पिनट्रेस्ट) चोरी केलेले असल्याचा दावा ‘आप’ने केला आहे. भाजपला ‘भारतीय झुठा पार्टी’ म्हणत याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

एकीकडे भाजपने केजरीवालांची ‘भ्रष्टाचारी’ प्रतिमा जनमानसात ठसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री मान आपल्या उरलेल्या सत्तेला वाचवण्यासाठी कायदेशीर आणि घटनात्मक मार्गांचा अवलंब करत आहेत. आगामी काही दिवस दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version