Spread the love

सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई; ८ वाहने जप्त, ५५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व उपसा करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाने सलग दुसऱ्या दिवशीही मोठी संयुक्त मोहीम राबवत कठोर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ एप्रिल २०२६ रोजी सुरू झालेली ही कारवाई २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी पार पडली.

या धडक मोहिमेदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारी एकूण ८ वाहने ताब्यात घेण्यात आली. संबंधित वाहनचालकांविरुद्ध बी.एन.एस. २०२३ च्या कलम ३०३(२) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३०(१) व १७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस स्टेशननिहाय कारवाई
धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे, तर वाळूची किंमत १२ हजार रुपये आहे.

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ डंपर जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे १५ लाख रुपये व वाळूची किंमत १८ हजार रुपये आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ डंपर जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे २८ लाख रुपये व वाळूची किंमत २२ हजार रुपये आहे.

एकूण जप्त वाहनांची किंमत सुमारे ५५ लाख रुपये असून, जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळूची किंमत सुमारे ४२ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

संयुक्त पथकाची कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करत ३ डंपर जप्त केले. विविध पथकांनी समन्वय साधत ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

कारवाई सुरूच राहणार
अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत असून, जिल्ह्यातील खनिज संपत्तीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version