Spread the love

“श्रमिकांच्या हक्कासाठी लढणार” ; नगरसेवक रोहन सूर्यवंशी यांची जाहीर भूमिका

भुसावळ (करण शिंदे) : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ नगरपालिकेत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात यंदा केवळ औपचारिकता नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस चर्चा रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना भुसावळचे तरुण नगरसेवक रोहन राजू भाऊ सूर्यवंशी यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, शिक्षण, कामाच्या सुविधा आणि श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नांचा मुद्दा थेट उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

“वर्षानुवर्षे शहरासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न फक्त फाईलमध्ये राहू नयेत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशा ठाम शब्दांत रोहन सूर्यवंशी यांनी आपली भूमिका मांडली. उपस्थित नगरसेवकांसमोर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर विशेष पाठपुरावा करून ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचे जाहीर आश्वासन दिले.

कामगार दिनाच्या दिवशीच श्रमिकांच्या अडचणींना वाचा फोडत नगरपालिकेतील वास्तव परिस्थिती समोर आणल्याने या भूमिकेची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, केवळ राजकीय भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेणारा तरुण चेहरा म्हणून रोहन सूर्यवंशी यांच्याकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, शहरातील विविध कर्मचारी संघटनांकडूनही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात येत असून, “कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी आता पुढे यायला हवेत,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. भुसावळ शहरात वाढत्या नागरी समस्या, मनुष्यबळावरील ताण आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांचा प्रश्न गंभीर होत असताना, महाराष्ट्र दिनी उपस्थित करण्यात आलेला हा मुद्दा आगामी काळात नगरपालिकेच्या राजकारणात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version