“इतिहास विसरू नका, सजग राहा” – यशोदाताई पाटील यांचे आवाहन
मांडा–टिटवाळा : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा पटांगणात आयोजित हिंदू संमेलन उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले. विविध घटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून यशोदाताई पाटील आणि हर्षदाताई केणे यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. “आपल्या हिंदू परंपरेचा आणि महापुरुषांच्या इतिहासाचा विसर पडू देऊ नका,” असे आवाहन करत त्यांनी समाजातील जागरूकतेवर भर दिला. विशेषतः मुलींना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत सावध राहण्याचे आवाहन केले.
महापुरुषांच्या कार्याची उजळणी
वक्त्यांनी हिंदू संस्कृतीची महानता अधोरेखित करत इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, ताराराणी आणि येसूबाई यांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
समाजातील एकजुटीवर भर
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुल मिश्रा यांनी आपल्या भाषणात समाजातील एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. “नागरिक आणि व्यापाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य केल्यास समाज अधिक सक्षम होईल,” असे त्यांनी सांगितले.
शिस्तबद्ध आयोजन, प्रेरणादायी वातावरण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन देवसर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या संमेलनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता, सांस्कृतिक अभिमान आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
