तीन दिवसांत २४ गुन्हे, २५ आरोपी अटकेत; ६१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत मोठी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तस्करांचे जाळे उध्वस्त करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
३० एप्रिल ते २ मे या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवण्यात आली. धरणगाव, यावल, शनिपेठ, भडगाव, चाळीसगाव, रावेर, पाचोरा आणि एमआयडीसी परिसरात पोलिसांनी एकाच वेळी धाडी टाकत तस्करांना गाठले. या कारवाईत एकूण २४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या मोहिमेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी ७८ जिवंत जनावरांची (गाय, बैल, गोऱ्हे व म्हशी) सुटका केली. तसेच ४६३ किलो अवैध गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची आणि मांसाची किंमत सुमारे १५ लाख २३ हजार २३० रुपये इतकी आहे. याशिवाय, अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १४ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत ४६ लाख १० हजार रुपये आहे. एकूण कारवाईची किंमत तब्बल ६१ लाख ३३ हजार २३० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात “महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, २०१५” तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कठोर कलमांचा वापर करण्यात आला आहे. जप्त वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, अवैध गोवंश वाहतूक व कत्तल करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून, जिल्ह्यात अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सातत्याने राबवण्यात येणार आहेत.या धडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून, कायद्याचा धाक निर्माण करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कडक कायद्याचा वापर
तस्करांविरुद्ध केवळ गुन्हे दाखल न करता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम २०१५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कठोर कलमांचा वापर करण्यात आला आहे. जप्त केलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे.
तस्करांना इशारा
जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गोवंश हत्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही निरंतर सुरू राहतील, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
