Spread the love

शिवकालीन युद्धकलेच्या प्रशिक्षणातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वसंरक्षणाची जागृती

नशिराबाद | धीरज सत्यवाल |

नशिराबाद येथे “राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसूर्य ज्वाळा” या प्रेरणादायी ध्येयमंत्राने भारलेले पाच दिवसीय भव्य ‘भक्ती-शक्ती शौर्य शिबिर’ उत्साहात पार पडले. भक्ती-शक्ती शिवकालीन युद्धकला गुरुकुल यांच्या वतीने आयोजित या निवासी शिबिराचा समारोप ९ मे रोजी झाला. ५ मेपासून सुरू झालेल्या या शिबिरात ६ वर्षांवरील मुला-मुलींसह महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत शिवकालीन मर्दानी खेळांचा रोमांचक अनुभव घेतला.

स्वसंरक्षणासोबत राष्ट्रप्रेमाचे धडे

आजच्या धावपळीच्या आणि असुरक्षित वातावरणात स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना शिवकालीन युद्धकलेचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरात लाठी-काठी, तलवारबाजी, भालाफेक, दंडपट्टा, मल्लखांब आणि रोप मल्लखांब यांसारख्या पारंपरिक युद्धकलांचे प्रशिक्षण देण्यात आले. या कलांमुळे युवकांमध्ये शारीरिक क्षमता, धैर्य आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले. यासोबतच नियुद्ध, भारतीय पारंपरिक खेळ आणि बौद्धिक वर्गांद्वारे शिस्त, संघभावना आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कारही रुजविण्यात आले. शिवकालीन परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख युवकांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिबिरातून करण्यात आला.

तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

या शिबिरासाठी अनुभवी प्रशिक्षकांची मोठी फळी कार्यरत होती. आशिष गुरुजी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षक म्हणून विनायक भोईसमर्थ गायकवाडचेतन भोई आणि हर्षल भोई यांनी विशेष मेहनत घेतली. महिला प्रशिक्षणार्थींसाठी दिक्षा गायकवाडजान्हवी रोटेमानसी भारंबेटीना धांडेट्विंकल राजपूत आणि शिवानी लोहार यांनी प्रशिक्षण दिले.

योगेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य

या उपक्रमाचे सहयोजक म्हणून माजी नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष सहकार्यामुळे हे शिबिर शिस्तबद्ध आणि यशस्वी पद्धतीने पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

समारोप प्रसंगी थरारक प्रात्यक्षिके

शिबिराच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी शिकलेल्या युद्धकलांचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. तलवारबाजीचा वेग, दंडपट्ट्याचे कौशल्य आणि मल्लखांबातील संतुलन पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले. शिवकालीन गौरवशाली परंपरेचे जतन करत तरुण पिढीला सक्षम आणि स्वाभिमानी बनविण्याचा उद्देश या शिबिरातून यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

या उपक्रमामुळे नशिराबादसह जळगाव परिसरात शिवकालीन युद्धकलेबद्दल नव्याने उत्साह आणि जनजागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version