पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना; एक बैलही दगावला, गावात हळहळ
जळगाव (जगदिश सपकाळे) : गिरणा नदीच्या पात्रातून बैलगाडी नेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत वडनगरी येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५, रा. वडनगरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप कल्याणकर आणि त्यांचे सहकारी चिंतामण नाईक हे दोघेही नेहमीप्रमाणे खेडी भोकर शिवारातील शेतात मजुरीसाठी बैलगाडीतून जात होते. गिरणा नदीचे पात्र ओलांडताना नदीतील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने अचानक बैलगाडी उलटली. प्रसंगावधान राखत चिंतामण नाईक यांनी तात्काळ उडी घेत आपला जीव वाचवला. मात्र दिलीप कल्याणकर यांना सावरण्याची संधी न मिळाल्याने ते खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेत एक बैलही पाण्यात बुडून मृत झाला, तर दुसरा बैल बचावला. मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दिलीप कल्याणकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
