१,७०० केळीचे घड कापून फेकले, अट्रावलच्या शेतकऱ्याचे सुमारे ६ लाखांचे नुकसान; यावल पोलिसांत गुन्हा दाखल
यावल : तालुक्यातील अट्रावल येथील शेतकऱ्याच्या यावल शिवारातील केळीच्या बागेत अज्ञात माथेफिरूने घुसून तब्बल १ हजार ७०० केळीच्या झाडांवरील घड कापून फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
अट्रावल येथील शेतकरी किरण निळकंठ महाजन यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक ५९४ मध्ये ९० आर क्षेत्रात सुमारे ३ हजार २०० केळीच्या खोडांची लागवड करण्यात आली होती. केळी कापणीसाठी तयार झाली असताना सोमवारी त्यांचे भाऊ प्रवीण महाजन हे शेतमजूर विकास नाले यांच्यासह शेतात गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणावर केळीचे घड कापून जमिनीवर पडलेले दिसले.
यानंतर किरण महाजन यांनी शेतात पाहणी केली असता ३ हजार २०० पैकी तब्बल १ हजार ७०० झाडांवरील केळीचे घड अज्ञात व्यक्तीने कापून टाकल्याचे निदर्शनास आले. नुकसान करण्याच्या उद्देशाने अज्ञात माथेफिरूने शेतात प्रवेश करून हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीदेखील अट्रावल व यावल शिवारात अशाच प्रकारे केळी बागांचे नुकसान करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश सानप करीत आहेत.
