Spread the love

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोजची कोंडी; अपघातांचा धोका वाढला

जळगाव (सुमेश मुळे) : शहरातील अत्यंत वर्दळीच्या नेरीनाका चौफुलीवर वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून वाहनधारक आणि नागरिकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. चौफुलीवरील ट्रॅफिक सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने येथे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. परिणामी, या ठिकाणी सतत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून कोंडी निर्माण होत आहे.

नेरीनाका चौफुली ही टॉवर चौक आणि अजंठा चौफुलीला जोडणारी महत्त्वाची वाहतूक कडी मानली जाते. या मार्गावरून जड आणि हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात असले तरी वाढत्या गर्दीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. सिग्नल यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेला लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नेरीनाका चौफुलीवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने ट्रॅफिक सिग्नल सुरू करावेत तसेच अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version