Spread the love

दोषी डॉक्टरांवर फौजदारी कारवाईची मागणी; गजानंद लिंबोरे यांचा मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे इशारा

उल्हासनगर  : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोरे यांनी आक्रमक भूमिका घेत दोषी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे अधिकृत तक्रार पाठवत प्रशासनाला जाब विचारला आहे.

रुग्णालयातील हलगर्जीपणामुळेच संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप लिंबोरे यांनी केला आहे. मृत्यूनंतर रुग्णालयात निर्माण झालेला तणाव आणि तोडफोडीच्या घटनांमागेही डॉक्टरांचा अक्षम्य निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. केवळ तोडफोडीवर कारवाई करून चालणार नाही, तर उपचारात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवरही कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
गजानंद लिंबोरे यांनी आपल्या निवेदनात संबंधित डॉक्टरांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४-अ अंतर्गत तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर संदेश देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी
उपचारात गंभीर निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालय (CMO) आणि आरोग्य सेवा संचालनालय (DHS) यांच्या माध्यमातून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.

रुग्णालयातील अनागोंदीवर संताप
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, अपुरी वैद्यकीय सुविधा आणि प्रशासकीय गलथानपणामुळे रुग्णांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“सामान्य गोरगरीब जनतेचा जीव इतका स्वस्त नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एखादे कुटुंब उद्ध्वस्त होत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही गजानंद लिंबोरे यांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version