Spread the love

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार केल्याचा राग; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका पत्रकाराला थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच धमकावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरातील फेरीवाला लॉबीची वाढती दादागिरी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार विनोद प्रेमनारायण गिरी यांनी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात बातमी प्रसिद्ध करून तसेच संबंधित तक्रार केडीएमसी प्रशासनाकडे दाखल केली होती. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या काही फेरीवाल्यांकडून पत्रकारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

याच पार्श्वभूमीवर १२ मे रोजी डोंबिवली पोलीस ठाण्याच्या परिसरात छाया अमोल खिल्लारे या महिलेने पत्रकार विनोद गिरी यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. “तुला बघून घेईल, एक महिला काय करू शकते हे तुला दाखवते,” अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार थेट पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. फेरीवाला लॉबी इतकी बेधडक झाली आहे का की ती आता थेट पोलीस ठाण्याच्या परिसरातही धमक्या देऊ लागली आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी मनोज गिरी यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2) अंतर्गत एनसीआर क्रमांक 1708/2026 नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी, नागरिकांना होणारा त्रास आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत आधीच प्रश्न उपस्थित होत असताना आता पत्रकारालाच धमकी देण्याच्या घटनेमुळे वातावरण आणखी तापले आहे. पत्रकार संघटनांकडूनही या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी तसेच पत्रकार आणि सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version