Spread the love

छावा संघटना, डॉक्टर्स असोसिएशन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा महावितरणाला इशारा

पारोळा (सुरेश पाटोळे) : पारोळा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्णालये मोठ्या अडचणीत सापडली आहेत. वाढत्या उकाड्यात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना, डॉक्टर्स असोसिएशन तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रुग्णांच्या जीवितास धोका
डॉक्टर्स असोसिएशन पारोळा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे गंभीर रुग्णांच्या उपचारांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत. अनेक महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे इन्व्हर्टरवर कार्यरत राहत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

रुग्णालये ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत आणि अखंड ठेवण्याची मागणी डॉक्टर संघटनेने केली आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता देखील व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना यांनी आपल्या निवेदनात शहरातील वाढत्या लोडशेडिंगचा मुद्दा उपस्थित केला. कमी दाबाचा वीज पुरवठा, रात्री अचानक वीज जाणे आणि तासन्‌तास अंधाराचे वातावरण यामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचे संघटनेने नमूद केले. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

आंदोलनाचा इशारा
सामाजिक कार्यकर्ते आणि दोन्ही संघटनांनी महावितरण प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. पारोळा शहरातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी देखील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version