Spread the love

“नोकरीत सामावून घ्या, अन्यथा महामार्गावर बिरहाड आंदोलन” — संतप्त कर्मचाऱ्यांचा इशारा; शिवसेनेकडून दखल घेत अधिकाऱ्यांना धारेवर

धुळे (सुनील निकम) :  मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील ललिंग टोलनाका येथे परराज्यातील कंत्राटदाराकडून स्थानिक मराठी तरुणांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, रोजगार हिरावला जात असल्याने संतप्त झालेल्या सुमारे दीडशे टोल कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. धुळे व चांदवड टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी थेट टोलनाका परिसरात आंदोलन छेडत न्यायाची मागणी केली आहे.

ललिंग टोल नाक्यावर यापूर्वी कार्यरत असलेल्या आय एस टी पी एल कंपनीचे कंत्राट संपल्यानंतर राजस्थानच्या रोड लिंक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे नवीन कंत्राट देण्यात आले. मात्र, नवीन कंपनीने मोजक्याच कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाईल, अशी तोंडी सूचना दिल्याने गेली अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून रुग्णवाहिका सेवा, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग, अग्निशमन आणि क्रेन विभागात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. “आम्ही वर्षानुवर्षे सेवा दिली, आता परराज्यातील कंपनी येऊन आमच्यावर अन्याय करत आहे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रोजेक्ट डायरेक्टरशी थेट संपर्क साधत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी “स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,” असे आश्वासन प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना देण्यात आली. तथापि, अद्याप लेखी आदेश न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. “आम्हाला तोंडी आश्वासन नको, तर सेवेत कायम ठेवण्याचा स्पष्ट निर्णय हवा,” अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा निर्णय तातडीने घेतला गेला नाही, तर संपूर्ण कुटुंबासह राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल. तसेच ‘बिरहाड आंदोलन’ करत महामार्गावरच ठिय्या मांडण्याचा निर्धारही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आंदोलनस्थळी शेकडो टोल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version