डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी यांचे आवाहन
जळगाव : देशातील महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम असलेल्या जनगणना २०२७ मोहिमेला नुकतीच सुरुवात झाली असून, या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी “आधी देशासाठी, मग माझ्यासाठी” या भावनेतून स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मतदान जनजागृती कार्याचे डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी यांनी केले आहे.
केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास १ मेपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी स्वगणना (Self Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले. यासाठी नागरिकांनी जनगणना स्वगणना संकेतस्थळ या संकेतस्थळाला भेट देऊन विचारण्यात आलेल्या सोप्या प्रश्नांची माहिती भरावी. या प्रक्रियेसाठी विविध भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन माहिती भरल्यानंतर नागरिकांना ११ अंकी क्रमांक प्राप्त होणार असून, तो क्रमांक सुरक्षित जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा क्रमांक १५ मेनंतर घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणकाला दिल्यानंतर संबंधित नागरिकांची जनगणना प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील सामाजिक, सेवाभावी संस्था, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करून नागरिकांना या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुक्ती फाउंडेशनतर्फे डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी यांनी केले आहे.
