२० मेच्या देशव्यापी बंदला सहकार्य करण्याची मागणी
पारोळा (संदीप पाटील) : दि. २० मे २०२६ रोजी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सतर्फे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर पारोळा व एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने संयुक्तरित्या पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांचा वाढता दबाव, बदलती बाजारपेठ तसेच वाढती स्पर्धा यामुळे छोट्या केमिस्ट व्यावसायिकांसमोर निर्माण झालेल्या गंभीर अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. छोट्या औषध विक्रेत्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. तसेच २० मे रोजी होणारा देशव्यापी बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोलदादा पाटील यांच्याकडे केली.
हा उपक्रम माननीय केमिस्ट भूषण तथा श्री. सुनील भाऊ भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. आमदार अमोलदादा पाटील यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी पारोळा-एरंडोल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
