Spread the love

दोन्ही किडन्या निकामी झालेल्या मुलासाठी आईने दिली स्वतःची किडनी; पहूरमध्ये मायलेकरांच्या नात्याची भावस्पर्शी चर्चा

पहूर (गणेश वानखेडे) : आईच्या मायेपुढे कोणताही स्वार्थ टिकू शकत नाही, याची प्रचिती देणारी भावनिक घटना जामनेर तालुक्यातील पहूर येथे समोर आली आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जन्मदाती आईने स्वतःची किडनी दान करून त्याला नवजीवन दिल्याने सर्वत्र या मायलेकरांच्या नात्याची चर्चा सुरू आहे.

पहूर येथील कुंदन अमृत वानखेडे (वय ३१) हा मुंबई येथे आधार सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. एमएस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आधार सेंटरमध्ये नोकरी सुरू केली होती. मात्र काही दिवसांपासून त्याच्या चेहऱ्यावर व पायांवर सूज येऊ लागल्याने त्याने मुंबईत उपचार घेतले. सुरुवातीला किरकोळ त्रास समजून उपचार सुरू होते, परंतु कालांतराने प्रकृती अधिकच खालावल्याने तो गावी परतला.

जळगाव येथे प्राथमिक तपासणीनंतर त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत कुंदनच्या दोन्ही किडन्या जवळपास ९० टक्के निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. ही बाब समोर येताच वानखेडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

आई ठरली मुलासाठी देवदूत
अशा कठीण प्रसंगी कुंदनची आई लीलाबाई वानखेडे या खंबीरपणे पुढे सरसावल्या. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न लावता स्वतःची किडनी मुलाला देण्याचा निर्णय घेतला.

शहरातील खासगी रुग्णालयातील डॉ. प्रदीप सारुक आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. आईची किडनी मुलाच्या शरीराशी जुळल्यानंतर प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला. तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

मायलेकरांची प्रकृती स्थिर
सध्या आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती स्थिर असून वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून ते गावी परतणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे “आई हीच खरी सावली” असल्याची भावना पुन्हा अधोरेखित झाली असून, आपल्या मुलासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकते, याचे जिवंत उदाहरण पहूर येथे पाहायला मिळाले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version