Spread the love

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; इलेक्ट्रिक कारने केला प्रवास, ताफाही केला कमी

जळगाव : पेट्रोल-डिझेल बचतीसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री पाटील यांनी इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास करत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यातही कपात केली असून अनावश्यक वाहनांचा वापर टाळण्यावर भर दिला आहे. वाढते इंधन दर, प्रदूषण आणि पर्यावरणीय समतोल लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करत “इंधन बचत हीच राष्ट्रसेवा” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, सर्वसामान्य नागरिकांनीही पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य शासनाकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, त्यातून इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री पाटील यांच्या या कृतीमुळे पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version