गेल्या २४ तासांत तापमानात तब्बल ३ अंशांची घट; पुढील काही दिवस ४२ ते ४३ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघालेल्या जळगावकरांना अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा सलग ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, हवामानात अचानक बदल झाल्याने गेल्या २४ तासांत तापमानात तब्बल ३ अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली आहे.
१५ मे रोजी जळगाव शहराचे कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. त्याआधी १४ मे रोजी तापमानाचा पारा ४५.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. अवघ्या एका दिवसात झालेल्या या लक्षणीय घसरणीमुळे नागरिकांना कडक उन्हापासून काही प्रमाणात आराम मिळाला आहे. मात्र, तापमानात घट झाली असली तरी उकाड्याची तीव्रता कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट होती. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत होते, तर घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी कठीण झाले होते. विशेष म्हणजे, रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
पुढील काही दिवस कसे राहणार हवामान?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगावकरांना पुढील काही दिवसही काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २० मेपर्यंत तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच जिल्ह्यात काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने उष्णतेची तीव्रता आणखी कमी होऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना प्रखर उन्हापासून थोडाफार दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
