Spread the love

प्रथम पुरस्काराला अजित पवार यांचे नाव, कृषी क्षेत्रातील १८ नवकल्पनांना विशेष मदत

पुणे : राज्यातील कृषी क्षेत्र अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’च्या धर्तीवर राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ आयोजित करण्यात येणार असून, या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कृषी विभागाच्या वतीने कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’च्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने यांच्यासह कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “शेती अधिक उत्पादनक्षम आणि भविष्योन्मुख करण्यासाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड अत्यावश्यक आहे. कृषी नवसंकल्पना स्पर्धा या केवळ स्पर्धा नसून भविष्यातील कृषी व्यवस्थेला दिशा देणारे उपक्रम आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, पुणे ॲग्री हॅकेथॉनला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षापासून ही स्पर्धा राज्यव्यापी करण्यात येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, पुणे ॲग्री हॅकेथॉनमधील निवडक १८ नवकल्पनांना पुढील टप्प्यात शासनामार्फत विशेष मार्गदर्शन आणि मदत देण्यात येणार आहे. त्यापैकी किमान १२ प्रकल्प प्रत्यक्ष बाजारात उतरावेत यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेची सुरुवात झाली. बदलत्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक असून, अशा उपक्रमांमुळे कृषी क्षेत्रात नवे प्रयोग आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळणार आहे.

विभागनिहाय विजेते जाहीर
स्पर्धेत विविध कृषी आणि तंत्रज्ञानाधारित विभागांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांना पारितोषिके देण्यात आली.

मृदा आरोग्य व व्यवस्थापन : विजेता – किसान साथी | उपविजेता – नॅनो वीटा

स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन : विजेता – आयओएच अभियंता समूह | उपविजेता – फार मोअर

कृषी यांत्रिकीकरण व कृत्रिम बुद्धिमत्ता : विजेता – एग्रीटेक नेक्सस | उपविजेता – टीम व्हीएनएमकेव्ही

कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी : विजेता – विन विन बाईट्स | उपविजेता – सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स

अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन : विजेता – प्रोटो फीड्स | उपविजेता – इको एक्सट्रॅक्ट

पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन : विजेता – स्मार्ट बायो डिलिव्हरी | उपविजेता – कृषी नेत्र

हवामान अनुकूल व डिजिटल शेती : विजेता – डीप अँग बॉट | उपविजेता – मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स

भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण : विजेता – क्रॉप जेन एआय | उपविजेता – ग्रीन माइंड्स

स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता : विजेता – ई-पिक ऑडिट एआय | उपविजेता – कृषी प्रबंध

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्रातील नवसंशोधनांना नवी चालना मिळणार असून, युवा संशोधक आणि स्टार्टअप्ससाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version