Spread the love

३६ व्या शहीद दिनानिमित्त नशिराबाद पोलीस स्टेशन येथे भावपूर्ण श्रद्धांजली सोहळ्याचे आयोजन

नशिराबाद (धीरज सतीवाल ): ८१ बटालियन सीआरपीएफचे वीर जवान शेख उस्मान बिसमिल्लाह यांच्या ३६ व्या शहीद दिनानिमित्त नशिराबाद पोलीस स्टेशन येथे भावपूर्ण श्रद्धांजली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवानास अभिवादन केले.

शौर्याचा इतिहास आणि सर्वोच्च बलिदान
शेख उस्मान पिंजारी हे सीआरपीएफच्या ८१ बटालियनमध्ये कार्यरत होते. पंजाबमधील अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान त्यांनी लुथियन दहशतवाद्यांविरुद्ध शौर्याने लढा दिला. देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देत त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल आणि देशसेवेतील योगदानाबद्दल त्यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून गौरविण्यात आले होते.

पोलीस स्टेशनमध्ये स्मृतिदिन सोहळा
नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नशिराबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष Yogesh Patil यांनी भूषवले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात योगेश पाटील म्हणाले, “शहीद जवान शेख उस्मान पिंजारी यांनी देशासाठी दिलेले बलिदान हे नशिराबाद गावासह संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या शौर्याची गाथा येणाऱ्या पिढ्यांना देशप्रेम आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहील.”

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे आयोजन शहीद जवानाच्या पत्नी सौ. फरिदा बी. उस्मान पिंजारी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या बलिदानास सलाम केला. यावेळी “शहीद जवान शेख उस्मान पिंजारी अमर रहे” तसेच “जय हिंद” च्या घोषणांनी परिसर देशभक्तीमय झाला होता. देश त्यांच्या या सर्वोच्च त्यागाला सदैव स्मरणात ठेवेल, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version