Spread the love

२० मे रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आंदोलन; नागरिकांना सहभागाचे आवाहन

जळगाव : वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, स्मार्ट मीटरच्या नावाखाली होणारी लूट तसेच लोडशेडिंगच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने २० मे २०२६ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चुल्हा जलाओ आंदोलन’ करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

बहुजन मुक्ती पार्टीने देशभरात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीन टप्प्यांत आंदोलन छेडले असून, त्याचा दुसरा टप्पा म्हणून हे आंदोलन होणार आहे. पक्षाच्या मते, गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन कठीण झाले आहे. त्यातच स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पक्षाच्या निवेदनानुसार, राज्यात सध्या प्रचंड उष्णतेची लाट असताना ४५ अंश सेल्सिअस तापमानात लोडशेडिंगमुळे नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. विजेअभावी ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनली असून सामान्य जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीस केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे.

या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १२ मे रोजी देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात २० मे रोजी सकाळी १० वाजता देशातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चुल्हा जलाओ आंदोलन’ करण्यात येणार आहे. जळगावमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडणार आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरे आणि जिल्हा युवा अध्यक्ष सुनील देहाडे यांनी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, हे आंदोलन केवळ राजकीय नसून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आणि वाढत्या आर्थिक संकटाविरोधात आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. महागाईमुळे गृहिणी, कामगार, शेतकरी आणि बेरोजगार युवकांचे जगणे कठीण झाले असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले असून विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version