समाधान हेल्पलाईनवर धमकीचा फोन; मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस आयुक्तांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. समाधान हेल्पलाईनवर फोन करून अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या पार्श्वभूमीवर महापौरांना तातडीने विशेष पोलीस सुरक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवत महापौरांच्या सुरक्षेबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. धमकी देणारी व्यक्ती मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असले तरी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापौर रवी लांडगे हे शहरातील विविध नागरी प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने नागरिकांमध्ये फिरत असून पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, स्वच्छता आणि विकासकामांबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनावर दबाव आणत असल्याने त्यांना अनेक संवेदनशील प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
“महापौर हे शहरातील एक महत्त्वाचे घटनात्मक पद आहे. शहरातील लाखो नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये. तातडीने विशेष पोलीस संरक्षण देऊन प्रशासनाने जबाबदारी पार पाडावी,” अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
दरम्यान, धमकीच्या फोननंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संबंधित कॉलचा तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर आणि तांत्रिक पथकाच्या मदतीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. महापौरांना सुरक्षा देण्याबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.
