Spread the love

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना फाशी द्या”; दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी घोषणाबाजी

धुळे (सुनील निकम) : देशभरात खळबळ उडालेल्या NEET पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ धुळे युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. युवासैनिकांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था ‘एनटीए’विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर संताप व्यक्त केला.

“विद्यार्थ्यांच्या कष्टाचा बाजार मांडणाऱ्यांना फाशी द्या”, “पेपरफुटी माफियांना संरक्षण देणारे कोण?”, “प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आंदोलनामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी युवासेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, देशभरातील लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करतात. अनेक पालक कर्ज काढून मुलांना कोचिंग क्लासेसला पाठवतात. मात्र, पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात असून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झाला आहे.

आंदोलनानंतर युवासेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये NEET पेपर फुटी प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा देणे, विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी पारदर्शक फेरपरीक्षेचा निर्णय घेणे तसेच वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे ‘एनटीए’ची सखोल चौकशी करून परीक्षा यंत्रणेची पुनर्रचना करणे या मागण्यांचा समावेश होता.

“हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि पालकांच्या आयुष्यभराच्या कष्टाचा प्रश्न आहे. दोषींना शिक्षा होईपर्यंत युवासेना संघर्ष सुरू ठेवेल,” असा इशारा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

हे आंदोलन युवासेना जिल्हा युवाधिकारी कुणाल कानकाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख न्हणू परदेशी, निंबा मराठे, महानगर प्रमुख धीरज पाटील, अण्णा फुलपगारे, प्रशांत भामरे, जयेश फुलपगारे, दीपक जाधव, तरबेज शेख, गोपी चव्हाण, जयेश नाईक, गोलू मुर्तडक, आवी जोंधळे, प्रणित पाटील, प्रेम कानकाटे, तुषार शिंदे, वैभव कानकाटे, यश वराडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version