Spread the love

राज्यभरातील नर्सेस संघटना आक्रमक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; “रुग्णसेवेशी निगडित परिचारिकांना दिलासा द्या” अशी मागणी

धुळे (सुनील निकम) : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत परिचारिकांना प्रशासकीय बदली प्रक्रियेतून कायमस्वरूपी वगळण्यात यावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे सविस्तर निवेदन सादर करत परिचारिकांच्या समस्या आणि अडचणी शासनासमोर मांडल्या.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा असून ग्रामीण, दुर्गम आणि शहरी भागात दिवस-रात्र अखंडपणे रुग्णसेवा बजावत आहेत. विशेषतः कोविड महामारीच्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता परिचारिकांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील स्वरूपाचे असल्याचे संघटनेने नमूद केले.

संघटनेच्या मते, परिचारिकांना प्रशासकीय बदलीच्या कक्षेत आणल्यामुळे अनेक गंभीर सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. परिचारिकांकडे कोणत्याही प्रकारचे आर्थिक किंवा प्रशासकीय नियंत्रण नसताना त्यांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करणे अन्यायकारक असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

“परिचारिका हा स्त्रीप्रधान व्यवसाय आहे. अचानक होणाऱ्या बदल्यांमुळे महिलांचे कौटुंबिक आयुष्य विस्कळीत होते. मुलांचे शिक्षण, महिलांची सुरक्षितता, वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी आणि कौटुंबिक स्थैर्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो,” असे संघटनेने निवेदनात स्पष्ट केले आहे.

तसेच रुग्णालयांतर्गत नियमित बदल्या होत असल्याने स्वतंत्र प्रशासकीय बदलीची आवश्यकता राहत नसल्याचेही संघटनेने म्हटले आहे. सततच्या बदल्यांमुळे मानसिक ताण वाढत असून त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता असल्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

अनेक परिचारिका आणि त्यांचे पती वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असल्याने कौटुंबिक समस्या अधिक गंभीर बनत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिचारिकांना प्रशासकीय बदली प्रक्रियेतून कायमस्वरूपी वगळून शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

हे निवेदन देताना महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा घोडके यांच्यासह मनीषा कुलकर्णी, अनुपमा लोंढे, सचिन कुंभार, कविता सरदार, भावना सोनवणे, जयश्री पाटील, प्रीती कोळी, कमल जाधव, वर्षा माने, मृणालिनी हिरे, समिता नादकर, स्वाती न्हावी, धनश्री सोनवणे आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, परिचारिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन कोणती भूमिका घेते, याकडे आता आरोग्य विभागातील हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version