गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, स्मार्ट मीटर आणि NEET भ्रष्टाचाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
जळगाव : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढ, स्मार्ट मीटर योजना, बेरोजगारी तसेच NEET परीक्षेतील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी जोरदार “चुल्हा जलाओ आंदोलन” करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक यांनी जाहीर केलेल्या तीन टप्प्यातील आंदोलनाच्या दुसऱ्या चरणांतर्गत हे आंदोलन देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर करण्यात आले. जळगावात बहुजन मुक्ती पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष सुनिलभाऊ देहडे, राज्य कोषाध्यक्ष विनोदभाऊ अडकमोल आणि राज्य संघटक प्रमोदभाऊ सौंदणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष चुल्हा पेटवून त्यावर भाकरी व भाजी तयार करत वाढत्या गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला. “सर्वसामान्य नागरिकांचे जगणे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे असह्य झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी स्मार्ट मीटर योजनेवरही तीव्र टीका करण्यात आली. “स्मार्ट मीटर ही सामान्य जनतेची लूट करण्याची योजना असून खाजगी कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. या मीटरमुळे वीजबिलांमध्ये वाढ होत असून नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
तसेच NEET परीक्षेतील कथित भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे युवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या आणि सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला.
आंदोलनानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी अनिताताई पेंढारकर, संगिताताई देहडे, शितलताई सोनवणे, दिपालीताई पेंढारकर आणि जयश्रीताई तायडे यांनी चुल्ह्यावर तयार केलेली भाकरी आणि भाजी प्रतीकात्मक स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली. विशेष म्हणजे जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेनेही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. संघटनेचे नेते सुनिलभाऊ भंगाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काळ्या टोप्या परिधान करून आंदोलनस्थळी उपस्थिती लावत सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सावरकर रिक्षा युनियन, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, सोशल डेमोक्रॅटिक पक्ष, मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा, रविदास क्रांती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांसह अनेक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ३१ मे रोजी “धक्का मारो आंदोलन” करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून राज्यभरात हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
केमिस्ट संघटनेचे मा.सुनिलभाऊ भंगाळे व त्यांचे सहकारी,सावरकर रिक्षा युनियनचे दिलीपभाऊ सपकाळे, बहुजन क्रांती मोर्चाचे सुमित्र अहिरे सर, कुंदन तायडे,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे खुमानसिंग बारेला,चुडामणदादा सोनवणे,प्रकाशभाऊ मालचे, आंबेडकरी विचारवंत जयसिंग वाघ साहेब,कोळी महासंघाचे गोपाळदादा कोळी,अरुण तावडे साहेब, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे डॉ.एस.एस.राणे सर,वसंत कोलते,किशोर चौधरी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ.शाकीर शेख,हाफिज दानिश, सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे हाफिज कासीम, राष्ट्रीय मुलनिवासी पेन्शनर संघाचे आर.बी.परदेशी,डी.एम.भालेराव, रविंद्र मोरे,रमेश थाटे, त्र्यंबक सोनवणे, भीमराव नन्नवरे,मराठा सेवा संघाचे शेषराव पाटील सर,भारत मुक्ती मोर्चाचे देवाभाऊ निकम,राहुलभाऊ सोनवणे, देविदास पारधे साहेब,मनोहर कोचुरे साहेब,रविदास क्रांती मोर्चाचे अविनाश वानखेडे सर,बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तवन ह्याळिंगे साहेब,मधुकर अहिरे साहेब,प्रभाकर मोरे साहेब , दिलीप तासखेडकर साहेब,असंघटित कामगार संघटनेचे भगवानदादा कांबळे, राष्ट्रीय गोरबंजारा संघाचे धनराज चव्हाण सर, रघुनाथ घोडेस्वार तसेच शे.खलील शे.कुतोबोद्दीन,धनराजभाऊ सरदार,महेंद्र साळवे सर,एन.पी.वले साहेब,आर.के.तायडे साहेब,अशपाकभाई शेख, शे.जावेद शे.मजीद,चिरागोद्दीन शेख,अकिलभाई शेख, आदि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
