Spread the love

अकृषक (NA) प्लॉटवर नियमबाह्य उद्योग सुरू असल्याचा आरोप; परवाना रद्द करून कारखाना स्थलांतरित करण्याची मागणी

नशिराबाद : नशिराबाद येथील रहिवासी परिसरात सुरू असलेल्या एका खासगी फळ प्रक्रिया कंपनीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. उग्र रासायनिक वास, सांडपाण्याची समस्या आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कंपनीचा परवाना तातडीने रद्द करावा, तसेच हा उद्योग औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हाकार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, मौजे नशिराबाद येथील गट क्रमांक १०३६ मधील प्लॉट क्रमांक ३७ आणि ३८ वर ‘फार्मफ्रेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया करून ज्युस निर्मितीचे काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान परिसरात तीव्र आणि गोडसर रासायनिक वास पसरत असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास, फुफ्फुसांचे विकार आणि अन्य आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनीमधून दररोज मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी बाहेर सोडले जाते. हे सांडपाणी परिसरात साचून राहत असल्याने दुर्गंधी वाढली असून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी, परिसरातील लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग तसेच खाज सुटण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे, ज्या जागेवर हा कारखाना सुरू आहे त्या जागेला प्रशासनाकडून रहिवासी प्रयोजनासाठी अकृषक (NA) परवाना देण्यात आलेला आहे. नियमानुसार या जागेचा वापर केवळ निवासी कारणांसाठी होणे अपेक्षित असताना, त्या ठिकाणी औद्योगिक आणि व्यावसायिक स्वरूपाचा उद्योग सुरू करून नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रहिवासी भागात अशा प्रकारचा रासायनिक प्रक्रिया उद्योग सुरू ठेवणे धोकादायक असल्याचेही नागरिकांनी निवेदनात नमूद केले.

“नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या उद्योगावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. संबंधित कंपनीची निवासी भागातील परवानगी रद्द करून हा कारखाना औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित करावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देण्यासाठी पंकज शामकांत महाजन, रविंद्र संतोष चौधरी, राहुल सुरेश चौधरी, निवृत्ती वासुदेव कोळी, वैभव संजय गोसावी, मुरलीधर गोविंदा पवार, भूषण कांतीलाल साळुंखे, संदीप आनंदा धनगर, भूषण भानुदास कोल्हे, संदीप विष्णू पाटील यांच्यासह नशिराबाद येथील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version