लळिंग घाटात विरुद्ध दिशेने आलेल्या वाळूच्या डंपरमुळे दुर्घटना; मदतीला धावलेल्या टोल कर्मचाऱ्यांचाही मृत्यू, महामार्गावर संताप
धुळे । सुनील निकम
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे भीषण तिहेरी अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू तर २६ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लळिंग घाट परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरमुळे हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास लळिंग घाटात वाहतूक कोंडी झाल्याने वाळूने भरलेला डंपर चुकीच्या दिशेने जात होता. याचवेळी समोरून येणाऱ्या दारूने भरलेल्या ट्रकला डंपरची जोरदार धडक बसली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि रस्त्यावर गोंधळ उडाला.
अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी टोल कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मात्र काही क्षणांतच मागून वेगात येणारी ट्रॅव्हल्स बस नियंत्रण सुटल्याने थेट दारूच्या ट्रकवर आदळली. त्यामुळे मदतकार्य करणाऱ्यांनाही या अपघाताचा फटका बसला आणि दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण दुर्घटनेत लक्झरी बस चालक जावेद खान (वय ४३, रा. बडवाणी, मध्य प्रदेश), अपघातग्रस्तांना मदत करणारे मनोज नरवाल (वय ३२, रा. टोकरे, मालेगाव) तसेच टोल कर्मचारी गणेश हिरामण थोरात (वय ३५, रा. हटकर वाडी, चितोड रोड, धुळे) यांच्यासह अन्य तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या अपघातात सुरभी महाजन, शिवाय महाजन, दीपक वालकाय, सपना महाजन, अनिता वालकाय, विजय सिंग, तब्रिश अन्सारी, सपना दिवान, इमरान खान, भावना हटकर, हुसेना, सामीन सय्यद, शकीला सय्यद, सय्यद आयुब, शैलेश आक्य, जेबन अली, मुस्कान खान, अनिल वर्मा, अरविंद जैन, अजय कुमार, सईद मोहम्मद, अंकित राजपूत, अभिजीत आपटे, कनक सोनी आणि संगीता सोनी यांच्यासह २६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स बसमध्ये २६ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्याचा आरोप केला असून पोलिसांकडून या दृष्टीनेही तपास सुरू करण्यात आला आहे.
अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडल्याचे भीषण दृश्य पाहायला मिळाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोहाडी पोलिस स्टेशन पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, टोल प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यासाठी मोठे बचावकार्य राबविण्यात आले.
दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत करताना टोल कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाल्याने टोल कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या आवश्यक साधनसामग्रीचा अभाव असल्याचा आरोप करत काही काळ महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाळूच्या डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे सहा जणांना जीव गमवावा लागल्याची चर्चा सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.
