Spread the love

मेहरूण तलावावर अग्निशमन दलाची शोध व बचाव प्रात्यक्षिके; विविध यंत्रणांचा संयुक्त सराव

जळगाव : येत्या मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थिती, बुडण्याच्या दुर्घटना तसेच विविध आपत्कालीन घटनांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी मेहरूण तलाव परिसरात विशेष शोध व बचाव प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विविध विभागांच्या आपत्कालीन यंत्रणांची सज्जता आणि समन्वय क्षमता तपासण्यात आली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस दल, जळगाव महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग तसेच महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरूण तलावावरील गणेश घाट येथे सायंकाळी पाच वाजता हे प्रात्यक्षिक पार पडले. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थिती, पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका, विजेच्या दुर्घटना आणि अन्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर या प्रात्यक्षिकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या सरावादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आधुनिक शोध व बचाव उपकरणांचा वापर करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. बोटींच्या सहाय्याने पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढणे, आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे, बचाव पथकांमध्ये समन्वय राखणे तसेच दुर्घटनास्थळी तातडीची मदत पोहोचविण्याचे विविध प्रकार सादर करण्यात आले. यामुळे आपत्कालीन प्रसंगी विविध यंत्रणा कितपत तत्परतेने काम करू शकतात, याची चाचणी घेण्यात आली.

मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर रावळ, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक बबन आव्हाड तसेच केंद्र अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव यशस्वीपणे पार पडला. यावेळी अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, यश अहिरे, अजय पाटील, दीपक चौधरी, १०८ ॲम्बुलन्स चालक संदीप गवले, डॉ. मोईन शेख, महावितरणचे कार्यकारी अभियंता साळी साहेब, हर्षल नेते, फायरमन योगेश कोल्हे, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, जगदीश साळुंखे, किरण पाटील, राकेश सोनवणे आणि विकी सोनवणे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यातील १५ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ८७ पोलीस चौक्यांना वितरित करण्यात आलेल्या आपत्कालीन बचाव साहित्य किटबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या किटमध्ये पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात आवश्यक असणारी विविध सुरक्षा साधने उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी महावितरणच्या आपत्कालीन पथकाने विजेच्या तारांजवळ धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या सुरक्षितरीत्या कशा कापल्या जातात, याचेही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे किंवा शॉर्टसर्किटच्या घटना टाळण्यासाठी अशा उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मान्सूनपूर्व आयोजित करण्यात आलेल्या या संयुक्त सरावामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन अधिक सक्षम आणि सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला जात असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version