Spread the love

संवेदनशील भागांत वाढवला बंदोबस्त; शांतता व सौहार्द राखण्याचे नागरिकांना आवाहन

धुळे : आगामी बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी धुळे शहरातील संवेदनशील आणि हिंदू-मुस्लिम मिश्रवस्ती भागांत पोलिसांच्या वतीने भव्य पथसंचलन अर्थात रूट मार्च काढण्यात आला. या पथसंचलनामुळे शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.

धुळे जिल्ह्यात २८ मे २०२६ रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हे पथसंचलन पार पडले.

शहरातील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी पोलीस चौकी, भोईवाडा, वडजाई रोड, भोला बाजार, मच्छीबाजार, महादेवपुरा, मौलवीगंज, घड्याळवाली मशिद ते बारा पत्थर या परिसरातून पोलिसांनी संचलन केले. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते तसेच काही भाग संवेदनशील म्हणून ओळखले जात असल्याने पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले.

या रूट मार्चमध्ये अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, शहर वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच धुळे शहर, आझादनगर, देवपूर, पश्चिम देवपूर, मोहाडीनगर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे जवान आणि होमगार्ड यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

पोलिसांनी नागरिकांना बकरी ईद उत्सव शांततेत आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारे संदेश पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. धुळे शहरात पोलिसांच्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, आगामी बकरी ईद उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version