प्रवासासाठी आलेल्या दांपत्याला बसस्थानकातच फटका; ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास
यावल (जगदीश सपकाळे) : यावल शहरातील बसस्थानक परिसरात प्रवासासाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाफिज खान अब्बास खान (वय ४९), त्यांची पत्नी फरजाना बी आणि मुलगी सदफ परविन, रा. ताहा नगर, फैजपूर हे रविवारी यावल बसस्थानकात प्रवासासाठी आले होते. बसस्थानकातील कंट्रोल कॅबिनजवळ ते बसलेले असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून फरजाना बी यांच्या पर्समधील सोन्याचा हार आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
काही वेळानंतर पर्स तपासली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत. बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
