Spread the love

कवी ग्रेस यांच्या कविता, आठवणी आणि संवेदनांचा अविस्मरणीय साहित्यिक प्रवास

ठाणे (मिलिंद मिरजकर) : साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर यांच्या “महाकवी दुःखाचा” या विशेष साहित्यिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कवी ग्रेस यांच्या कविता, आठवणी आणि त्यांच्या संवेदनशील साहित्यविश्वाचा वेध घेणारा हा कार्यक्रम नुकताच श्रीराम व्यायामशाळा संस्था येथे उत्साहात पार पडला.

अभ्यासपूर्ण विवेचन, संवेदनशील मांडणी आणि आत्मीय सादरीकरणामुळे कार्यक्रमाने उपस्थित साहित्यप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. कवी ग्रेस यांच्या कवितांमधील सूचकता, गूढ प्रतिमासृष्टी, रूपके आणि गर्भित अर्थ सतीश सोळांकूरकर यांनी ओघवत्या आणि विद्वत्तापूर्ण शैलीत उलगडून सांगितले. त्यामुळे ग्रेस यांच्या कविता केवळ ऐकण्यापुरत्या मर्यादित न राहता नव्या जाणिवांसह अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.

कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, नरेंद्र पाठक, मिलिंद बल्लाळ यांच्यासह नितीन केळकर, संदेश ढगे, कांताराम सोनावणे, सुधीर चित्ते, मंगेश सातपुते, रामदास खरे, अंजुशा पाटील, जनार्दन म्हात्रे, कल्पना पाटकर, विद्या बनसोडे, विकास भावे, साधना ठाकूर, संध्या लगड, निकिता भागवत, शिवानी गोखले, श्रीनिवास नार्वेकर आदी मान्यवर तसेच विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरल्या त्या सतीश सोळांकूरकर यांनी सांगितलेल्या कवी ग्रेस यांच्या आठवणी. बाह्यतः अलिप्त आणि कठोर वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वामागील प्रेमळ, जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील माणूस त्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शैलीत उभा केला. विशेषतः ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याविषयी सांगितलेला प्रसंग रसिकांच्या मनाला भिडला. एका महाकवीची दुसऱ्या कवीप्रती असलेली नम्रता आणि आदरभाव यामुळे उपस्थित वातावरण भावुक झाले.

यावेळी प्रा. अशोक बागवे यांनीही आपल्या मनोगतातून ग्रेस यांच्या कवितेकडे पाहण्याची नवी दृष्टी उपस्थितांसमोर मांडली. तर निकिता भागवत यांनी सादर केलेले ‘भय इथले संपत नाही’ हे गीत कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले. त्यांच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे सभागृहात काव्यमय वातावरण निर्माण झाले. ग्रेस यांच्या कविता, आठवणी आणि भावविश्वाचा वेध घेणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांना समृद्ध साहित्यिक अनुभव दिला. साहित्य भारती, ठाणे यांच्या या उपक्रमाचे साहित्यवर्तुळातून विशेष कौतुक होत असून कार्यक्रमाची चर्चा अद्यापही साहित्यप्रेमींमध्ये रंगताना दिसत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version