Spread the love

लोकाभिमुख नेतृत्वाला गीतातून मानवंदना; कार्यकर्ते आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊसो. गुलाबराव पाटील यांच्या ५ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तथा शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी यांनी “एकच धून पाच जून” हे विशेष गीत तयार केले असून, या गीताला कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीला आणि सर्वसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला या गीतातून शब्दबद्ध करण्यात आले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील हे सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील विकासकामे, पाणीपुरवठा योजना, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेले घट्ट नाते यामुळे त्यांनी जनमानसात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मुकुंद गोसावी यांनी स्वयंस्फूर्तपणे हे गीत सादर करून वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

मुकुंद गोसावी हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असून ते शतकवीर रक्तदाता म्हणून ओळखले जातात. गरजू आणि गंभीर रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी ते सातत्याने रक्तदान सेवा उपक्रमात सहभागी होत असतात. जीपीएस परिवाराच्या माध्यमातून आयोजित आरोग्य सेवांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात रक्ताची कमतरता भासणाऱ्या रुग्णांसाठी ते अहोरात्र कार्यरत राहतात.

त्यांनी तयार केलेल्या “एकच धून पाच जून” या गीतामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि आपुलकीचे प्रतिबिंबही दिसून येते. सोशल मीडियावर हे गीत मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. कार्यकर्त्यांनी देखील हे गीत आपल्या स्टेटस, सोशल मीडिया पोस्ट आणि विविध कार्यक्रमांमधून प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक, आरोग्य व जनहिताचे उपक्रम राबविण्याची तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच मुकुंद गोसावी यांच्या गीताने वाढदिवसाच्या उत्सवाला वेगळी रंगत आणली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version